प. बंगलासाठी भाजपाने खूप मोठी किंमत मोजली, मोदींची प्रतिमा खालावली

0
386

देश, दि. २ (पीसीबी) : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. साम दाम दंड भेद अशी सर्व आयुधे वापरली. फोडाफोडी, हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुविकरण, ममतांना बेगम म्हणून हिनवणे, त्यांचा जयश्रीराम म्हणायला विरोधा आहे असा प्रचार कऱणे अगदी वैयक्तीक पातळीवर टीका केली. इतके करूनही एका महिलेकडून भाजपाने जो सपाटून मार खाल्ला.

त्याचा आता देश पातळीवरील राजकारणावर परिणाम संभवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत जी प्रतिम कमावली होती ती प. बंगालच्या सत्ताकारणात घालवली. कोरोना साथीपेक्षा मोदींना निवडणुका महत्वाच्या वाटल्या आणि त्यांनी पूर्ण देशाचाच कडेलोट केला, ही सामान्य माणसाची भावना अधिक दृढ होत गेली. भाजपाला आगामी काळात येणाऱ्या निवडणुकासुध्दा आता सोप्या असणार नाहीत, हेसुध्दा स्पष्ट झाले. मोदी-शाह या जोडगोळीची जादू संपली असाही संदेश गेला.

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. काँग्रेस आणि डाव्यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या तलवारी म्यान केल्या आणि एकप्रकारे भाजपा विरोधात ममता यांनाच साथ देऊ केली. ही ताकद एकवटली आणि २०० जागांचे दिवा स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला एका ममतारुपी दुर्गेने एकदम चितपट केले. हा पराभव भाजपाच्या खूप जिव्हारी लागला आहे.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

मोदी यांची प्रतिमा डॅमेज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळातील अर्धे मंत्री, भाजपाचे विविध राज्यांचे मुख्यमंत्री, पदाधिकारी यांच्यासह मोठा ताफा प्रचारासाठी उभा केला होता. कोरोनाची मोठी लाट सुरू असताना स्वतः मोदी यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि प्रचारात अक्षरशः झोकून दिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि देश कोरोनाच्या मोठ्या संकटात सापडला. देशातील खूप मोठ्या प्रमाणावर जनमत मोदी यांच्या विरोधात गेले. जगातील सर्व माध्यमे, देशातील मीडिया त्यावर बोलू लागला. भाजपातील अनेक खासदार, आमदार, पदाधिकारी, प्रवक्तेसुध्दा जाहीरपणे मोदी यांच्या विरोधात उघडपणे भाष्य करू लागले. आजवर मोदी यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका मांडायची कोणाची हिंमत नव्हती, आता सर्रास सामान्य जनताही मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका करते आहे. भाजपाबद्दल देशपातळीवर जे एकतर्फी वातावरण होते ते कुठेतरी आता बदलले आहे. प. बंगालचा निकाल हे त्याचेच ध्योतक समजले जाते.