प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेली घरे नागरिकांच्या मालकीच्या करा – आमदार लांडगे

0
787

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – प्राधिकरणाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेली सर्व घरे त्यांच्या मालकी हक्काची करावीत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लांडगे यांनी सदाशिव खाडेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील गावठाणे वगळून प्राधिकरणासाठी जमिनींचे संपादन करण्यात आले आहेत. संपादित जागांवर गृहनिर्माण सोसायट्यांना प्राधिकरणाने परवानगी दिली. त्यानुसार प्राधिकरणाच्या जागांवर रहिवाशी सोसायट्या, व्यापारी संकुले उभारण्यात आले आहेत. परंतु, गेल्या ४० वर्षांपासून प्राधिकरणाने जागेचा मालकी हक्क स्वत:कडे ठेवला आहे. तर, गृहनिर्माण सोसायट्यांना भाडेपट्ट्याचा दर्जा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी प्राधिकरणाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. या त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधिकरणाने संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या जागा नागरिकांच्या मालकी हक्काच्या कराव्यात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये.”