प्रभाग स्तरावर समुपदेशन केंद्र व हेल्प लाईन तत्काळ सुरू करा – जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची आयुक्तांकडे मागणी

0
590

प्रतिनिधी दि. २४ जून : कोरोनाच्या महामारीचे आर्थिक व मानसिक दुषपरिणाम आता समाजात दिसू लागले आहेत. गोरगरीब वर्ग, मध्यमवर्गापासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत असे सर्व स्तरांवर कोरोनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फटके बसत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक समस्यांव्यतिरिक्त आर्थिक मंदी, बेरोजगारी, मागणी व पुरवठ्याची विस्कटलेली साखळी अशी अनेक संकटे समोर येऊ लागली आहेत. या सर्व स्थितीमुळे समाजात नैराश्याची भावना हळू हळू निर्माण होऊ लागली आहे. आर्थिक चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र नागरिकांच्या मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आर्थिक संकट व अनिश्चितता यामुळे नैराश्याने ग्रासल्याने आत्महत्यांचे प्रमाण अचानकपणे वाढू लागले आहे. शहराच्या दृष्टीकोनातून हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. समाजाचे आरोग्य व स्वास्थ्य राखण्यासाठी महापालिकेने आपल्या करदात्यांची काळजी करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारीच आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या महिला बाल विभागाच्यावतीने तातडीने प्रभाग निहाय समुपदेशन केंद्र व मोफत हेल्पलाईन सेवा सुरु करावी, अशी मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर होत असलेल्या परिणानामांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका सिमा सावळे यांनी मनपाआयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. सावळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. या शतकातील सर्वात मोठी आरोग्य विषयक आणीबाणी या आजाराने निर्माण केली आहे. याचा मानवी जीवनावर मूलगामी आणि दूरगामी परिणाम होत आहेत. आर्थिक नुकसानासोबतच मानसिक आरोग्यावर देखिल विपरीत परिणाम होत असल्याचे दिसायला लागले आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या कोरोनाच्या या मोठ्या संकटामुळे अनामिक भीती, चिंता, ताण वाढला आहे. भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. एकूणच समाजात नैराश्याची भावना हळू हळू निर्माण होऊ लागली आहे. लॉकडाऊन व आता अनलॉक काळातील आर्थिक संकट व अनिश्चितता यामुळे अनेकजण नैराश्याने ग्रासले गेले आहेत. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण अचानकपणे वाढू लागले आहे. या महामारीच्या काळात आणि नंतर लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने काही ठोस कार्यक्रम आखायला हवा. तसेच यावर उपाय योजना करण्यासाठी महिला बाल विभागाच्यावतीने तातडीने प्रभाग निहाय्य समुपदेशन केंद्र व मोफत हेल्पलाईन सेवा सुरु करावी, अशी मागणी सावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आत्महत्यांचे लोन सर्वाधिक घातक –
देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक कामगारांचा रोजगार गेला. आगामी काळात किमान ४० टक्के कामगार बेरोजगार होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. आयटी मधील कर्मचाऱ्यांत मोठी घबराट आहे. अगदी सलून ते हॉटेल व्यावसायिक, बिल्डर ते बिगारी, मोलमजुरी करणारे, हातगाडी, पथारीवाले, घरकाम करणाऱ्या महिला असे सर्व घटक काळजीत आहेत. अशी नैराश्यजनक परिस्थिती समाजाला कोरोनापेक्षाही घातक ठरू शकते. अगदी गेल्या आठ दिवसांतील घटनांवर नजर टाकली तरी या विषयाचे आकलन आणि गांभिर्य लक्षात येईल. वाकड, पिंपळे सौदागर येथील दोन घटनांत आयटी अभियंत्यांनी जीव संपवला. पुणे शहरात एका कुटुंबातील लहान मुलांसह चौंघांनी गळफास घेतला. त्याच दिवशी एका सुतार व्यवसायिकाने काम नसल्याने जीवन संपवले. पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी तीन कामगारांनी नोकरी गेली म्हणून आत्महत्या केली. नाशिक शहरात एका शिक्षिकेने नोकरी जाण्याच्या भितीपोटी गुजराथमध्ये अहमदाबार शहरात सहा जणांनी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे गळफास घेतला. आत्महत्यांच्या या बातम्या समाज कोणत्या दिशेने चालला आहे ते सांगण्यासाठी अत्यंत बोलक्या आहेत. अंगावर शहारे येतील अशा या घटना आहेत. त्यावर तातडिने एक रामबाण उपाय म्हणून समुपदेशन केंद्र प्रत्येक प्रभागात असले पाहिजे. त्यातून अनेकांचे जीव वाचतील. समाजाचे एका पिढीचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी आपण स्वतः लक्ष देऊन निर्णय घ्यावेत अशी विनंती सावळे यांनी आयुक्तांना केली आहे..

समुपदेशन केंद्र असे हवे –
समुपदेशन केंद्र स्थापन कऱण्यासाठी अधिकृत प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, वकील, पोलीस, सामाजिक कार्यकर्ता, स्थानिक नगरसेवक असे पॅनल असावे. या क्षेत्रात सेनाभावी वत्तीने काम कऱणारे असंख्य वकील, कार्यकर्ते आहेत. सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) मधून मोठ्या कंपन्या त्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मोठी मदत करू शकतात. हा विषय तत्काळ मार्गी लावण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपण ताबडतोब थेट कार्यवाहीच्या दृष्टीने पावले टाकावीत अशी कळकळीची विनंती सावळे यांनी केली आहे.