चीन सोबत वर्षाला 7 लाख कोटीचा व्यवहार, बहिष्काराचे काय होणार ?

0
344

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : भारत-चीन राजनैतिक संबंधाला 1 एप्रिल 2020 रोजी 70 वर्षे पूर्ण झाले. याचा दोन्ही देशांनी आनंद साजरा केला. यानंतर पुढील वर्षभर यानिमित्ताने 70 कार्यक्रम करत उत्साह साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. यातून या ऐतिहासिक संबंधांना अधोरेखित करण्याचा उद्देश होता. मात्र, यानंतर 75 दिवसांनीच चीनने या संबंधांशी विश्वासघात करत भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या सैन्याच्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे आता हे कार्यक्रम होण्याच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. चीन सोबत भारताचे गेतववर्षी सुमारे ७ लाख कोटींचे व्यवहार झाले. आता चिनी मालावर व सेवांवर बहिष्कार टाकायचा तर ७ लाख कोटींवर पाणी टाकावे लागेल. भारतातील व्यापाऱ्यांचे देशपातळीवर प्रतिनिधीत्व कऱणाऱ्या फेडरेशनने चिनी वस्तूंवर बहिष्काराचा निर्णय केला. बडे उद्योजकसुध्दा त्याच माणसिकतेत आहेत.

संरक्षण विषयावरील तज्ज्ञ आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये राजदूत राहिलेल्या जी. पार्थसारथी यांनी या स्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अमेरिका-चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दोन्ही देश यापेक्षा अधिकचा तणाव पेलू शकत नाही. अशा विशेष स्थितीत भारत आणि चीनदरम्यान सीमेवरील तणाव तयार झाला आहे.”

या स्थितीत चीनला देखील सीमेवरील हा प्रश्न आपल्या हातातून बाहेर जावा आणि त्यातून तणाव वाढावा असं वाटत नाही. असं असलं तरी भारत सरकार येणाऱ्या काळात चीनवर नक्कीच काही आर्थिक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने रस्ते आणि सैन्याचे तळ तयार केले आहे. मागील काही वर्षात भारताने चीनच्या जवळच्या काही भागांमध्ये चांगले रस्ते बनवले आहेत. त्यावर चीनचा आक्षेप आहे. खरंतर चीनसोबत कोणत्याही देशाला संघर्ष नको आहे. आर्थिक क्षेत्रात चीन भारताच्या पाचपट पुढे आहे, तर सैन्य क्षेत्रात चारपट पुढे आहे. त्यामुळे चीनसोबत लढण्याचा निर्णय हा नाईलाजानेच घ्यावा लागणार आहे, असंही पार्थ यांनी नमूद केलं.

भारत-चीन संबंधांचा घटनाक्रम देखील महत्त्वाचा आहे. 1 एप्रिल 1950 रोजी भारत चीनमध्ये राजनैतिक संबंधांना सुरुवात झाली. भारत जगातील पहिला साम्यवादी नसलेला देश होता ज्याने चीनसोबत औपचारिक संबंध बनवले होते. ते संबंध आजपर्यंत विकसित होत आले आहेत. मात्र, चीनने केलेल्या या कुरापतीनंतर हे संबंध उद्ध्वस्त झाले आहेत.

भारत-चीन आर्थिक आणि व्यापारिक संबंध
1. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये वर्ष 2000 च्या आधी केवळ 22.8 कोटी रुपयांचा वार्षिक व्यापार होत होता.
2. भारतात चीनच्या जवळपास 1,000 कंपन्या काम करतात. यामुळे भारतात 2 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
3. भारतीय कंपन्यांनी चीनमध्ये जवळपास 7.6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तेथे 3 हब बनवण्यात आले आहेत.
4. दोन्ही देशांमध्ये मागील 20 वर्षात 32 पट व्यापार वाढला आहे.
5. 2019 मध्ये दोन्ही देशांमध्ये 7 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला.

भारत-चीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संबंध
1. दोन्ही देश विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनावर नियमित काळानंतर एक सामाईक कार्यशाळा घेतात.
2. भारतीय कंपन्यांनी चीनमध्ये तीन आयटी कॉरिडोअर बनवले आहेत.
भारत-चीन संरक्षण संबंध
1. दोन्ही देश दहशतवादविरोधी मोहिमांसाठी संयुक्तपणे सराव करतात.
2. संरक्षण विषयक यंत्रणेबाबत नियमित चर्चा होतात.
भारत-चीनमधील लोकांचा परस्पर संबंध
1. दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर नागरिकांच्या बैठकीसाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी यंत्रणा विकसित केली आहे.
2. दोन्ही देश फिल्ड ऑफ आर्ट, मीडिया फिल्म, प्रकाशन, संग्रहालय, खेळ, तरुण, पर्यटन, स्थानिक पारंपारिक औषधं, योग, शिक्षण आदी क्षेत्रातील नव्या गोष्टींची देवाणघेवाण करतात.
3. दोन्ही देश एकमेकांची शहरं आणि राज्य विकसित करण्याच्या प्रकल्पावरही काम करत आहेत.

भारत-चीन पर्यटनातील संबंध
1.भारत-चीनमधील प्रमुख शहरांमधून जवळपास 134 विमानांची उड्डाणं होतात.
2. चीनची 94 विमानं दर आठवड्याला भारतात येतात. भारताची 40 विमानं चीनमध्ये जातात.
3. मागीलवर्षी भारतातील 8 लाख लोक चीनमध्ये गेले होते. दुसरीकडे चीनचे 2 लाख लोक भारतात आले होते.
भारत-चीनमधील शिक्षण संबंध
1. भारतातील 20 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेत आहेत. चीनचे 2 हजार विद्यार्थी भारतात शिकत आहेत.
2. चीनने भारतात 2 कल्चरल लूबान इन्स्टिट्यूट बनवले आहेत. भारत चीनमध्ये अशा संस्थांच्या निर्मितीवर काम करत आहे.
3. चीनने भारतात 2 कन्फूशिअस इन्स्टिट्यूट आणि 3 चिनी भाषेच्या संस्था सुरु केल्या आहेत.