पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला; दोघांना अटक

0
270

पिंपळे निलख, दि. ५ (पीसीबी) – पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात दिलेल्या दोघांनी तरूणाकडे पैसे मागितले. पैसे देण्यासाठी तरुणाने नकार दिला असता दोघांनी तरुणावर कोयत्याने वार करत खूनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री टकले चौक पिंपळे निलख येथे घडली.

प्रतिक संतोष खरात, चेतन जावळे (दोघे रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत जितेंद्र छोटीलाल ठाकूर (वय 23, रा. टकले चौक, पिंपळे निलख. मूळ रा. झारखंड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या रूममध्ये जेवण बनवत असताना त्यांच्या साईटच्या शेजारील नदीपात्राच्या कडेला नेहमी दारू पिण्यासाठी येणारे आरोपी प्रतीक आणि चेतन फिर्यादी यांच्या रूममध्ये आले. पाणी पिण्याच्या निमित्ताने आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैसे मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून प्रतिक खरात याने त्याच्या कमरेला लपवलेला कोयता काढून फिर्यादी यांच्या डोक्यावर वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच या आरोपींनी पिंपळ निलख परिसरात भररस्त्यावर वाहने अडवून वाहनचालकांवर कोयत्याने वार केले. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक आरोपी वाहने अडवित आहे. तर दुसरा आरोपी थांबलेल्या वाहनचालकांवर कोयत्याने वार करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.