अवैधरित्या गुटखा विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाची दोन ठिकाणी कारवाई; गुटखा जप्त

0
296

चाकण, दि. ५ (पीसीबी) – अवैधरीत्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण परिसरात रविवारी (दि. 4) दोन ठिकाणी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख सहा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई वाकी खुर्द मधील जाधववस्ती, गणेशनगर येथे करण्यात आली. त्यामध्ये रामदास रोहिदास सहाणे (वय 24, रा. वाकी खुर्द), ओमजी बिश्नोई (वय 40, रा. खालुम्ब्रे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा घरात साठवून त्याची रिक्षातून वाहतूक केली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत रिक्षा, रोख रक्कम आणि 72 हजार 144 रुपयांचा गुटखा असा एकूण 1 लाख 11 हजार 774 रुपयांचा ऐवज जप्त केला.

दुसरी कारवाई चाकण येथील सत्यम पान स्टॉल या टपरीवर करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी किसन मिठाराम बंजरा (वय 32, रा. माणिक चाळ, चाकण), कैलास बोरले पवार (वय 40, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी चाकण मधील विसावा हॉटेलच्या समोर असलेल्या सत्यम पान स्टॉल या टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने टपरीवर कारवाई करून नऊ हजार 170 रुपये रोख रक्कम आणि 34 हजार 210 रुपयांचा गुटखा असा एकूण 43 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील दोन्ही प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.