‘पूर्व पीसीएमटीतील सव्वाशे कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत कायम करण्यास मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

0
370

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पूर्व पीसीएमटी मधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्यात गुरुवारी पीएमीएमएलच्या पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पूर्व पीसीएमटीतील कार्यशाळे मधिल चतुर्थश्रेणी कर्मचारी व चालक पदावरील काही कर्मचारी असे एकूण सव्वाशे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सेवा करीत होते या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायम करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत देखील यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. गुरुवारी पुणे येथे झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर माई ढोरे, पुण्याचेमहापौर मुरलीधरमोहोळ, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि पुणे मनपाचे नगरसेवक व संचालक प्रकाश ढोरे, पीएमीएमएलचे महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

या कर्मचाऱ्यांचे वेतन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमपीएलला दरमहा संचलन तूट म्हणून काही कोटी रुपये देत असते यातून दिले जावे अशीही उपसूचना याबैठकीत करण्यात आली. अशी माहिती पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीसीएमटी आणि पिंपरी पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीएमटी या दोन्ही परिवहन संस्थांचे 15 डिसेंबर 2007 ला पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) मध्ये विलिनीकरण करण्यात आले. यानंतर पीएमपीची संचलन तूट म्हणून पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका 40 टक्के याप्रमाणे रक्कम देतात. त्यामुळे या सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेगळी तरतूद करावी लागणार नाही.