कोयत्याच्या धाकाने ट्रक चालकाला लुटले; एकास अटक

0
627

वाकड, दि. २ (पीसीबी) – ट्रक चालकास मारहाण करुन कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटले. त्यातील एकाला वाकड पोलिसांच्या बीट मार्शलने पकडले. तर दुसरा आरोपी पळून गेला. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे तीन वाजताच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.

खंडू जालिंदर लोंढे (वय 24 रा. शिवराज नगर, रहाटणी) आणि त्याचा साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सादिक अब्दुल सत्तार सय्यद (वय 28 रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी बुधवारी (दि. 1) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी खंडू लोंढे याला वाकड पोलिसांच्या बीट मार्शलने जागेवरच पकडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सादिक सय्यद हे बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजताच्या सुमारास काळाखडक वाकड येथून आपला ट्रक घेऊन मुंबईच्या दिशेने चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपी खंडू लोंढे आणि त्याच्या साथीदाराने ट्रकला दुचाकी आडवी घातली. त्यानंतर दगडाने ट्रकची काच फोडली. फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या इसमांना मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली.

तसेच कोयत्याचा धाक दाखवत खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि टेप असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. जाताना आरोपीने हातातला कोयता हवेत भिरकावून गाडी पुढे आणली तर खल्लास करून टाकेल अशी धमकी देऊन जोरजोरात ओरडून रस्त्यावर दहशत निर्माण केली. या दहशतीला घाबरून रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी आपल्या गाड्या घाबरून मागे वळून निघून गेले.

त्यावेळी गस्तीवर असलेल्या वाकड पोलिसांच्या बीट मार्शलने आरोपी खंडू लोंढे याला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. गिरनार तपास करीत आहेत.