पूर्वीच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘या’ ठेकेदाराला अपात्र ठरवा; माजी महापौर योगेश बहल यांची आयुक्तांकडे मागणी

0
293

पिंपरी, दि.१६ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पूर्वी फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर या संस्थेच्या माध्यमातून कामे मिळविणारा ठेकेदार सध्या medinilla Pharma Private Limited या कंपनीच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेत सहभागी झाला आहे. दोन्ही कंपन्यांवर विनोद आडसकर हे संचालक असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. नव्याने हे ठेकेदार पालिकेची फसवणूक करण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी माजी महापौर योगेश बहल यांनी केली आहे. तसेच महापालिकेत कार्यरत असलेल्या आडसकर यांच्या पत्नी डॉ. अंजली ढोणे-आडसकर यांची विभागीय चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात बहल यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीसीसी, ऑक्सिजन बेड व आयसीयू बेडसाठी मनुष्यबळ पुरविण्याबाबत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अशाच जाहिरातीद्वारे फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर या ठेकेदार कंपनीचे संचालक विनोद आडसकर यांनी आपली पत्नी महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत असल्याचे लपविले.

पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवत निविदा मिळवली. त्यासाठी वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी अंजली ढोणे-आडसकर यांनी निविदा मिळविण्यासाठी मोठी रसद पुरविली होती. या ठेकेदाराने महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे, रुग्णांना लुबाडण्यात, महापालिकेने रुग्णांना उपलब्ध करुन दिलेली रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रकरणात या ठेकेदाराच्या कर्मचा-यांचा सहभाग सिद्ध झाला. त्यानंतर या ठेकेदाराचे काम काढून घेण्यात आले होते.

सध्या महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या इओआयमध्ये या ठेकेदाराने दुस-या कंपनीच्या माध्यमातून सहभाग नोंदविला आहे. पूर्वी फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअरच्या माध्यमातून काम मिळविणारा हा ठेकेदारा सध्या सध्या medinilla Pharma Private Limited या कंपनीच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. दोन्ही कंपन्यांवर विनोद आडसकर हे संचालक असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. नव्याने हा ठेकेदार महापालिकेची फसवणूक करण्याची शक्यता आहे.

पूर्वी केलेल्या फसवणुकीमध्ये सहभागी असल्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यात यावे. तसेच या ठेकेदाराच्या पत्नी महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत असल्याने संबंधित ठेकेदार पुन्हा महापालिका अधिनियमाची पायमल्ली करण्याचे धारिष्ट दाखवित आहे. त्यास महापालिकेच्या काही अधिका-यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. महापालिका अधिनियमाचे भंग करणारी ही कृती असल्याने संबंधित ठेकेदाराला अपात्र ठरविण्यात यावे. त्याचबरोबर महापालिकेत कार्यरत असलेल्या डॉ. अंजली ढोणे-आडसकर यांच्यावर कायदेशीवर कारवाई करावी. त्यांची विभागीय चौकशी करावी. विनोद आडसकर यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत या ठेकेदाराला पात्र ठरवून कायद्याची पायमल्ली केल्यास आयुक्तांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बहल यांनी दिला आहे.