भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का

0
257

औरंगाबाद, दि.१६ (पीसीबी) – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. पीएफची रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, पगारच मिळाला नसल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी मार्च महिन्यात कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करणार नसल्याची भूमिका घेत हे कामगार संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केलं होतं.