पूरजन्य परिस्थितीमुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

0
263

मुंबई, दि.२९ (पीसीबी) : राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः माहिती दिली. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असं आवाहन सामंत यांनी केलं.

उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आलाय. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय, रस्त्यांवर पाणी आलंय, संपर्क तुटलाय. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मला सांगायचं आहे की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही.”

“आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या लिंकवर नोंदणी झालीय त्या सर्वांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. त्यामुळे पुरामुळे ज्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत,” अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली.