कोरोनाकाळात महापालिका मुख्यालयात सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा खर्च लाखोंच्या घरात शिवाय…

0
244

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर साफसफाई करणाऱ्या ठेकेदाराने महापालिका मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि स्वच्छतागृहांमध्ये लिक्विड हॅण्डवॉश उपलब्ध करून दिले होते. 15 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या या वापरापोटी 9 लाख 51 हजार रुपये खर्च झाला आहे. त्यानुसार ठेकेदाराच्या या बिलाची पूर्तता करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारत आणि त्यामधील सर्व कार्यालये, बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता खासगीकरणाद्वारे यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यबळाद्वारे करण्यात येते. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

त्यानुसार तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची या कामासाठी 1 डिसेंबर 2018 ते 30 नोव्हेंबर 2020 या दोन वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली. या कामाची मुदत 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपुष्टात आली. या कामाची नव्याने निविदा प्रक्रिया कार्यवाही सुरू होती. त्यामुळे त्यांना तीन महिने कालावधीसाठी अथवा नवीन निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर मे 2021 मध्ये नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

या निविदा प्रक्रियेतही तावरे फॅसिलिटी यांनी इतर ठेकेदारांपेक्षा कमी दर सादर केल्याने दोन वर्षे कालावधीसाठी त्यांची साफसफाईकरिता नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यातर्फे 30 सफाई कामगार, दोन सुपरवायझर त्यामध्ये 50 टक्के महिला कामगार अशा मनुष्यबळाद्वारे साफसफाई केली जात आहे. दरम्यान, 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते.

तातडीची बाब म्हणून ठेकेदाराने महापालिका मुख्य इमारतीतील प्रवेशद्वार आणि सर्व विभागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, स्वच्छतागृहांमध्ये लिक्विड हॅण्डवॉश उपलब्ध करून दिले होते. त्यांनी 15 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत सॅनिटायझर आणि लिक्विड हॅण्डवॉशच्या केलेल्या वापरापोटी 9 लाख 51 हजार रुपये खर्च झाला आहे. त्यानुसार, त्यांच्या या बिलाची पूर्तता करण्यात येणार आहे.