पुरामुळे हजारो ट्रक चालक- क्लिनर लोकांची  दैना; पाण्यासोबत भात खाऊन काढतायेत दिवस

0
566

सातारा, दि. ८ ( पीसीबी) – सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात  पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरु आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रक चालक आणि क्लिनर लोकांची देखील आबाळ सुरु आहे.

पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पुर्णता थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसत असताना साताऱ्यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास ३ हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले आहेत. हे ट्रक गेले चार दिवसांपासून या ठिकाणी उभे आहेत. यातील बहुतांशी चालक आणि क्लिनर हे  केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे आहेत. लांब पल्याच्या गाड्या घेऊन मुंबई आणि पुण्याकडे निघालेले हे चालक पुरामुळे अडकले आहेत.

या रस्त्यात थांबवलेल्या ट्रकचे चालक आणि क्लिनर लोकांची यामुळे दैना अवस्था झाली आहे.  यांना जेवण आणि पिण्याचे पाणी देखील मिळत नाहीये. जेवणाची कुठलीही सोय नसल्याचे भात शिजवून पाण्यासोबत खावे लागत असल्याचे भीषण चित्र आहे.

मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आला आहे.  त्यामुळे पुणे कोल्हापूर बंगळूरू हा हायवे बंद झाला आहे.  हा हायवे कायम अतिशय व्यस्त असतो. मात्र आता पुरामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात हजारो ट्रक अडकले आहेत. दररोज हजारो ट्रक या मार्गावरून ये जा करतात. तर यातून कोट्यवधींच्या मालाची वाहतूक होत असते. या अनेक ट्रक्समध्ये नाशवंत माल असल्याने पाणी कमी झाले नाही तर हा माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होईल, असे ट्रकचालकांनी सांगितले आहे.