पुण्यात राजकीय नेत्यांचे नाव लिहून वायरमनची आत्महत्या

0
759

नऱ्हे, दि. २६ (पीसीबी) – सावकारी जाचाला कंटाळून एका वायरमने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५) नऱ्हे येथून उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये पुण्यातील राजकीय क्षेत्राती बड्या नेत्यांची नावे आहेत.

यशवंत हरिभाऊ पवार (वय ५४, रा़ रायकर मळा, धायरी) असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत पवार यांनी गुरुवारी दुपारी २ वाजता आपल्या पत्नीला व्हाट्सऍपवर आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध प्राशन केले. पतीने पाठविलेला मेसेज त्यांच्या पत्नीने बराचवेळ पाहिला नाही. सायंकाळी पाच वाजता त्यांनी पतीचा मेसेज पाहिला. त्यानंतर त्यांनी पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत दोन तरुण डोंगराच्या भागातून जात होते़ त्यांना तिथे मोटारसायकल आढळून आल्याने त्यांनी आसपास पाहिले.

तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीवर यशवंत पवार यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये पुण्यातील राजकीय क्षेत्राती बड्या नेत्यांची नावे आहेत. तसेच त्यांच्या नातेवाईकांचे फोन नंबरही त्यात होते. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेऊन खात्री केली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला. मात्र, चिठ्ठीतील दोन नावाविषयी आताच काही सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत.