पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला 167 कोटी रुपयांचा फटका

0
306

पुणे, दि.२७ (पीसीबी) – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे राज्यात मद्यविक्री बंद असल्याने पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला 167 कोटी रुपयांचा फटका बसला आहो. मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होतो. मद्यविक्री बंद असल्याने अनेक तळीरामांना चुटपूट लागून राहिली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दररोज 90 हजार लिटर्स देशी दारुची विक्री होते. एक लाख लिटर्स परदेशी मद्य, तर एक लाख लिटर्स बिअर जिल्ह्यात विकले जाते. पुणे शहर व जिल्ह्यात 1400 बिअर शॉपी, 265 वाईन्स शॉप आणि 700 परमिट रुम्स आहेत. या माध्यमातून महिन्याला 167 कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. परंतु मद्यविक्री बंद असल्याने पुण्यातून उत्पादन शुल्क विभागाला एका महिन्यात मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार असल्याचं राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे. ‘लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला, तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल.’ असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

दुसरीकडे, मद्य विक्रीमुळे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होत असल्याने दुकानं पुन्हा सुरु करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. दारुवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15 हजार कोटी मिळतात. जवळपास 35 दिवस झाल्याने राज्याचा मोठा महसूल बुडाला आहे.

‘खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची आवक सुरु व्हावी लागेल. जवळपास 18 मार्चपासून राज्य टाळेबंदीत आहे. आधी 31 मार्च, मग पुढे 14 एप्रिल आणि आता 3 मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील, याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स सुरु करुन महसुलाचा ओघ सुरु होईल, हे बघायला काय हरकत आहे, अशी सुचना राज ठाकरे यांनी केली होती.