पुण्यातील संभाजी उद्यानातला संभाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी हटवला; परिसरात संतापाचे वातावरण

0
523

पुणे, दि. १९ (पीसीबी) – स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून उद्यानाभोवती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज आणि राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसविण्यावरुन अनेक दिवसांपासुन वाद सुरु आहेत. संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात गडकरी यांचा पुतळा कशाला? असा प्रश्न उपस्थित करुन दोन वर्षापूर्वी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला होता. या पाश्वभूमीवर बुधवारी रात्री स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले याने उद्यानामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. हा पुतळा काढल्यास महाराष्ट्र पेटल, अशा आशयाचा फलक संबंधित ठिकाणी लावला. दरम्यान कारलेने संभाजी महाराजांच्या पुतल्यासमवेत सेल्फी काढत तो फोटो व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकारामुळे वातावरण बिघडु नये, यासाठी पोलिसांनी हा पुतळा तत्काळ हटविला. तसेच उद्यानाभोवती पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.