पुण्यातील विद्यार्थ्यांची गावी परतण्यासाठी मोफत व्यवस्था करा; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची राज्य सरकारकडे मागणी

0
339

प्रतिनिधी,दि.९ (पीसीबी) : पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणारे सुमारे चार हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकलेले असून अनेक विद्यार्थ्यांकडे पैसे शिल्लक राहिलेले नाही. राज्य शासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याची मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी शनिवारी केली.

मा. माधव भांडारी म्हणाले की, लॉकडाऊन मुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे किमान ३ ते ४ हजार विद्यार्थी पुणे शहरात अडकून पडलेले आहेत. मेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी अडचण झालेली आहे. काही सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना जेवण देण्याची व्यवस्था आतापर्यंत सुरु आहे, मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष व्यवस्था करण्याची गरज होती ती आतापर्यंत शासनाने केलेली नाही. संस्थांनी केलेली जेवणाची सोय आता अपुरी पडू लागली आहे. जवळचे पैसे संपत आल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कुटुंबियांकडून गावी परत कधी येणार अशी वारंवार विचारणा होत असल्याने ते अस्वस्थ होत आहेत. अनेक दिवसांपासून परत जाण्यासाठी व्यवस्था होण्याची मागणी सुरु असून देखील शासन काहीच हालचाल करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नाराजी वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परिवहन महामंडळाच्या बसेसने गावी पाठविण्याची व्यवस्था शासनाने करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांकडील पैसे संपत आल्याने त्यांच्यासाठी गावी जाण्याची व्यवस्था शासनाने मोफत करावी.