पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लॉकडाऊनमध्येच पाडणार, अजित पवारांच्या सूचना

0
498

लॉकडाऊन आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने याच कालावधीत हा पूल पाडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या .

पुणे, दि. २६ (पीसीबी) : पुणे शहरात सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या सूचना पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी अडचणीचा ठरणारा हा उड्डाणपूल पाडून वाहने आणि मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यास अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली.

लॉकडाऊन आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने याच कालावधीत हा पूल पाडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पवार यांनी केल्या आहेत. टाटा कंपनीनेही त्यासंबंधी तयारी दर्शवली आहे. नवीन पुलासाठी 250 कोटींचा खर्च येणार असून तो उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळील पुलाबाबत निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२५) बैठक झाली. भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन हा पूल आताच पाडणे सोयीस्कर ठरणार असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत सहमती झाली.

राज्यात तीन मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता किमान पुण्यातील लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाप्रमाणे हा पूल आताच पाडणे शक्य आहे. टाटा कंपनीने संपूर्ण पूल पाडून पुन्हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल, असे सांगितले आहे.