पुणे प्रादेशिक विभागामध्ये वीजग्राहकांकडून झाला ‘एवढ्या’ कोटींच्या थकबाकीचा भरणा

0
186

पुणे, दि. 10 (पीसीबी): आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणच्या ‘थकीत वीजबिल भरा, सहकार्य करा’ या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे प्रादेशिक विभागातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 10 लाख 17 हजार वीजग्राहकांनी गेल्या दोन महिन्यांत 1034 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. मात्र अद्यापही या वर्गवारीतील 18 लाख 65 हजार ग्राहकांकडे 964 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी आहे.

दरम्यान पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी शुक्रवारी (दि. 9) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे 230 अभियंत्यांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. प्रभाकर निर्मळे (कोल्हापूर) व श्री. राजेंद्र पवार (प्रभारी-पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. दि. 1 फेब्रुवारी ते 31 मार्चच्या कालावधीमध्ये थकीत वीजबिलांपोटी 1034 कोटी रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात ग्राहकांचा विश्वास संपादन करून ही कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांना श्री. नाळे यांनी शाबासकीची थाप दिली व कौतुक केले. तसेच वीजग्राहकांचे देखील आभार मानले.

गेल्या दोन महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यातील 395053 ग्राहकांनी 526 कोटी 12 लाख, सातारा जिल्हा- 169655 ग्राहकांनी 104 कोटी, सोलापूर जिल्हा- 129670 ग्राहकांनी 126 कोटी 34 लाख, कोल्हापूर जिल्हा- 188706 ग्राहकांनी 169 कोटी 79 लाख आणि सांगली जिल्ह्यातील 134425 ग्राहकांनी 107 कोटी 72 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर परिमंडलातील 52 आणि बारामती परिमंडलातील 13 अशा एकूण 65 गावांनी गेल्या दोन महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या वीजबिलांचा 100 टक्के भरणा करून थकबाकीमुक्तीचा मान मिळविला आहे.

मात्र अद्यापही मार्चअखेर पुणे प्रादेशिक विभागामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 18 लाख 65 हजार 40 वीजग्राहकांकडे 964 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 887939 ग्राहकांकडे 532 कोटी, सातारा जिल्हा- 131707 ग्राहकांकडे 40 कोटी 96 लाख, सोलापूर जिल्हा- 294237 ग्राहकांकडे 137 कोटी 18 लाख, कोल्हापूर जिल्हा- 348831 ग्राहकांकडे 168 कोटी 95 लाख आणि सांगली जिल्ह्यातील 202326 ग्राहकांकडे 85 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आहे.

उन्हाळ्याला सुरवात झाली आहे तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. अशा स्थितीत प्रामुख्याने कोविड रुग्णालये तसेच इतर सर्वच भागातील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत दिले. ग्राहकसेवा देताना सर्वांनी कोविड-19चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घ्यावी आणि आरोग्य जपावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. शंकर तायडे यांच्यासह प्रादेशिक विभागातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुख व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.