पुणेकरांची स्वदेशी विरुध्द विदेशी

0
359

पुणे, दि. ९ (पीसीबी)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या स्वदेशी वस्तू वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रयत्न पुण्यातूनही केला जात आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वापरताना त्यातील स्वदेशी वस्तू कोणत्या आणि विदेशी कोणती याची आपल्याला कल्पना नसते. ग्राहकांना याची माहिती व्हावी यासाठी पुण्यातील ग्राहक पेठेने एक अभिनव आणि मार्गदर्शक असा प्रयोग केला आहे. ग्राहकांना कोणत्या वस्तू स्वदेशी आणि कोणत्या विदेशी आहेत हे समजण्यासाठी प्रत्येक वस्तूच्या खाली स्वदेशी आणि विदेशी या नावाची चिठ्ठी लावली आहे. यामुळे ग्राहकांना वस्तूची निवड करणे सोपे जात आहे.

ग्राहकांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार वस्तू घेता येत आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व इनोव्हेटर सोनम वांगचुक यांचा चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा आणि स्वदेशी वस्तू वापरावर भर द्या असे आवाहन करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. नागरिकांनाही स्वदेशी वस्तूबाबत जागरुकता निर्माण झाली आहे.

ग्राहक पेठेचे प्रमुख सूर्यकांत पाठक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ग्राहक पेठ सुरू झाल्यापासून आम्ही कधीच मेड इन चायना, मेड इन इंग्लंड, मेड इन यूएसए वस्तू विकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा, असे सांगत स्वदेशी मालाचा पुरस्कार केला. त्यातून आम्हाला ही कल्पना सुचली.

लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी करायच्या असतील तर कुठल्या स्वदेशी आणि कुठल्या विदेशी वस्तू आहेत हे कळत नाही. त्यामुळे आमच्या दुकानातील प्रत्येक वस्तुखाली ती स्वदेशी आहे की विदेशी याची माहिती दिली. ग्राहकांना ज्या वस्तू पाहिजे असतील त्या ते घेऊन जातील ही त्यामागची कल्पना असल्याचेही ते म्हणाले.