पुढचा महापौर शिवसेनेचाच – रवींद्र मिर्लेकर

0
527

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात संघटनात्मक बांधणी मजबूत करावी. आगामी महापालिका निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. शहराचा पुढचा महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे, अशी जिद्द ठेवा, संकल्प करा, त्यादृष्टीने लोकाभिमुख कामे करावीत, अशा सूचना शिवसेना उपनेते, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसैनिकांना दिल्या.

‘शिवसेना मिशन 2022’ अंतर्गत चिंचवड विधानसभा क्षेत्राचा थेरगाव येथे झालेल्या मेळाव्यात मिर्लेकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहरसंघटक अ‍ॅड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, युवा सेना विस्तार अधिकारी राजेश पळसकर, युवा सेनेचे विश्वजीत बारणे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर अटळ आहे. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन होणार नाही. सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्वाची राहणार आहे, असा विश्वास मिर्लेकर यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शहरात शिवसेनेला मानणार मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला विक्रमी मतदान झाले. हे मतदान महापालिका निवडणुकीतही आपल्याला खेचून आणायचे आहे.

केवळ पैशाच्या जोरावर मतदार खरेदी करता येत नाही. शिवसैनिकांनी घराघरात संपर्क वाढवावा. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय घरोघरी पोहोचवावेत. नवमतदारांशी संपर्क वाढवा. मतदार नोंदणीवर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.