‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती

0
370

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. उद्या म्हणजेच ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात होत आहे. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाल्यास त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.