पिंपळेनिलखमधील साई चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण; आमदार जगतापांच्या हस्ते सोमवारी वाहतुकीसाठी खुला होणार

0
1535

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या एक लेनचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३१) सकाळी अकरा वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपळेसौदागरचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे असतील. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका निर्मला कुटे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित असतील.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार चौक आहे. वाढत्या नागरिकरणामुळे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे साई चौकातून प्रवास करणे कठिण बनले होते. या चौकात आल्यानंतर नागरिक व वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप व मी स्वतः पाठपुरावा केला आणि प्रत्यक्षात कामालाही सुरूवात झाली. या उड्डाणपुलाचे कामाचे वेगाने व्हावे यासाठी सातत्याने कामाचा आढावा घेण्यात येत होता. उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात होते. आता ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (३१ डिसेंबर) आमदार जगताप यांच्या हस्ते या उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. हिंजवडीतील आयटी हबमुळे पिंपळेसौदागर व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेल्या नागरिकांना या उड्डाणपुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुण्याकडे जाणे सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.”