पिंपरी महापालिकेच्या स्थायीमध्ये वाटून खाणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना विरोधी पक्षनेत्याचा दणका; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

0
5297

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत “तुम्ही भी खा आम्ही भी खातो”चे धोरण स्वीकारत ऐनवेळच्या विषयांना आणि वाढीव खर्चांना मंजुरी देताना गपगुमानपणे पाहणाऱ्या आणि “मनी व्हिटॅमीन” घेऊन निद्रिस्त होणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उघडे पाडण्याचे काम केले आहे. या चार नगरसेवकांच्या चुप्पीबाबत दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमध्ये राजकीय महाभारत सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादीचा इतिहास पाहता दत्ता साने यांच्या तक्रारीची अजितदादा फारशी दखल घेणार नाहीत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

महापालिकेच्या वतीने चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत कामाचा खर्च ४० कोटी धरण्यात आला होता. परंतु, स्थायी समितीने या कामाला वाढीव ५ कोटींची मंजुरी देत कामाचा खर्च ४५ कोटींवर नेला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने हे चिखली परिसरातून निवडून आले आहेत. त्यामुळे संतपीठाच्या कामाला वाढीव ५ कोटी रुपये मंजूर केल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे. सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यासोबतच स्थायी समितीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनाही त्यांनी धारेवर धरले आहे.

स्थायी समितीमध्ये माजी उपमहापौर राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, प्रज्ञा खानोलकर आणि गीता मंचरकर हे चार राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. संत पीठाच्या कामाला तब्बल पाच कोटींची वाढीव रक्कम मंजूर केली जात असताना स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे हे चार नगरसेवक काय झोपा काढत होते का?, असा त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला म्हणजे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना प्रश्न पडला आहे. त्यांनी आपल्याच पक्षाच्या चार नगरसेवकांच्या या संशयास्पद राजकीय भूमिकेबाबत पक्षश्रेष्ठी म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. गुरूवारी पत्रकार परिषदेत दत्ता साने यांनी पत्रकारांना स्वतः ही माहिती दिली. त्यामुळे स्थायी समितीत “तुम्ही भी खा आम्ही भी खातो” असे धोरण स्वीकारलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची होणार आहे. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्याने राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांची पंचाईत झाली आहे.

विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांनी स्थायी समितीत आपली काय छाप पाडली हा संशोधनाचा विषय होईल, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतीही विचारधारा नाही. फायदा तिकडे हा पक्ष अशी या पक्षाची राजकीय ओळख आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षात पक्षाची ओळख तंतोतंत जपण्याचेच काम केल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांची अजितदादांकडे कितीही तक्रार केली तरी त्यांच्यावर कारवाई होईल का? याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात शंका उपस्थित होत आहे.