पिंपरी चिंचवड शहरात आता फक्त 16 ठिकाणांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित

0
593
  • उर्वरित भागात अटी शिथील 
  • रुग्णवाढीची गती कमी झाल्याने प्रशासनाचा निर्णय

पिंपरी , दि. 27 (पीसीबी) –  “कोरोना’च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने  पूर्ण महापालिका क्षेत्राऐवजी केवळ 16 ठिकाणांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. 27 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत या 16 ठिकाणचा परिसर सील करण्यात येत आहे. या परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी केल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

कंटेंनमेन्ट झोन समाविष्ट क्षेत्रामध्ये खराळवाडी परिसर, पीएमटी चौक परिसर, गुरुदत्त कॉलनी परिसर(भोसरी), रामराज्य प्लॅनेट परिसर (कासारवाडी), गणेश नगर परिसर(दापोडी), शास्त्री चौक परिसर (भोसरी), संभाजीनगर परिसर (आकुर्डी), तनिष्क ऑर्किड परिसर (चऱ्होली), कृष्णराज कॉलनी परिसर( पिंपळे गुरव), नेहरुनगर बस डेपो परिसर, कावेरीनगर पोलीस लाइन परिसर, रुपीनगर परिसर, तळवडे, फातिमा मस्जिद परिसर(मोशी), विजयनगर परिसर(दिघी), आदिनाथनगर परिसर (भोसरी) आदींचा समावेश आहे.

कंटेनमेंट परिसरामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेतच जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तर शहराच्या उर्वरित भागात जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि दूध विक्री सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधांची दुकाने संपूर्ण कालावधीकरता खुली राहतील.