पिंपरी-चिंचवड शहरातून सहा दुचाकी, एक ट्रक चोरीला

0
294

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : वाहन चोरट्यांनी पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीची संख्या वाढत आहे. त्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना सपशेल अपयश येत आहे. काही वाहने पोलिसांनी पकडली असली तरी चोरीला जाणा-या वाहनांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. मंगळवारी (दि. 13) एकाच दिवसात चाकण, तळेगाव, चिखली, हिंजवडी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात सात वाहनचोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात सहा दुचाकी आणि एक ट्रक चोरीला गेला आहे.

चाकण परिसरातून 90 हजारांची रॉयल इन्फील्ड बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोन वाजता चाकण शहरातील माणिक चौकात घडला. जयंत नारायण चकोर (वय 29, रा. चाकण – शिक्रापूर रोड, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथून 12 हजारांची बजाज बॉक्सर दुचाकी चोरीला गेली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. सहदेव पुंडलिक पाटील (वय 58, रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिखली मधील हरगुडे वस्ती येथून घरासमोर पार्क केलेला दोन लाख रुपये किमतीचा 16 टायरचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यामध्ये 7 लाख 78 हजार 777 रुपयांचे 23 टन स्टील भरलेले होते. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला. याबाबत समाधान नवनाथ खरात (वय 30, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चांदणी चौक, बावधन येथील बंद असलेल्या पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची मोपेड दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 9 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. याबाबत अक्षय संजय कोंढरे (वय 26, रा. माताळवाडी फाटा, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुणाल किशोर चौधरी (वय 25, रा. नवी सांगवी) यांची 15 हजारांची आणि योगेश मधुकर रणपिसे (वय 28, रा. पिंपळे गुरव) यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात दोन वाहनचोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भगवंत शंकरराव होळगे (वय 35, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. होळगे यांची 10 हजारांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी घराच्या पार्किंग मधून चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) उघडकीस आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.