‘ दारू म्हणजे ‘लस’ नव्हे!’ सामना अग्रलेखातून राज ठाकरे यांच्यावर शरसंधान

0
411

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. या मुद्यावरून सामना अग्रलेखातून याबाबत राज ठाकरेंच्या खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राज ठाकरेंच्या या मुद्यावर निशाणा साधत ‘ दारू म्हणजे ‘लस’ नव्हे!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

दारुची दुकाने बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच महसूल वाढीसाठी दारुची दुकाने उघडण्याची मागणी केली होती.

अग्रलेखात म्हटले आहे की, लोकांना जगायचे आहे , पण दारू ही जगण्याची संजीवनी नाही. लोकांना कोरोनावर ‘लस’ हवी आहे. दारू म्हणजे अशा प्रकारची ‘लस’ नाही. दारू दुकाने म्हणजे लस संशोधन केंद्र नाही. सरकारने घेतलेला निर्णय तूर्त बरोबर आहे. 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार ‘कोरोना संक्रमण’ विकत घेणे परवडणारे नाही. संकटाचे भान ठेवा!

दारू दुकाने उघडल्याचा मद्यपींचा आनंद अखेर क्षणभंगूरच ठरला. दुकानांसमोर लोकांनी तोबा गर्दी केल्यामुळे मुंबईतील वाईन शॉप पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. दोन दिवसांत 65 कोटींची दारूविक्री एकट्या मुंबईत झाल्याची बातमी आहे. 65 कोटींची दारू विकल्याने सरकारी तिजोरीत पाच-दहा कोटींची माया जमली असेलही, पण मंगळवारी एका दिवसात मुंबईत 635 नवीन कोरोना रुग्ण आढळले. साधारण तिसेक लोकांचा मृत्यू झाला.
मुंबईने कोरोनाग्रस्तांचा दहा हजारांचा उंबरठा पार केला आहे व काही लोक दारूची दुकाने उघडली म्हणून खूष आहेत. राज ठाकरे यांनी दारू दुकाने उघडा असे सरकारला नम्र आवाहन केलेच होते. त्यांची भावना चांगली असेल, पण दारू दुकानांमुळे दोन दिवस रस्त्यांवर जो धिंगाणा घातला गेला, लोकांनी जो बेशिस्तीचा तमाशा केला तो पाहता सरकारला पुन्हा दारू विक्रीवर निर्बंध घालावे लागले. चेंबूर परिसरात मद्यपींनी रस्त्यावर धिंगाणा घातला.

रस्त्यावरील गाडय़ांची तोडफोड केली. महिला व इतर निरपराध्यांवर हल्ले केले. पोलिसांना जुमानले नाही. त्यामुळे त्या भागात एकच गोंधळ उडाला. दारूविक्री परवानगीचे हे ‘साइड इफेक्ट’ फक्त चोवीस तासांत समोर आले. दारू म्हणजे कोरोनावरील ‘लस’ किंवा जालिम दवा नव्हे, हे दारूविक्री समर्थकांनी लक्षात ठेवले पाहिजे. राज ठाकरे यांनी दारू दुकाने उघडा असे सांगितले तेव्हा डॉ. अभय बंग यांच्यासह अनेक प्रमुख लोकांनी त्या भूमिकेस विरोध केला.