पिंपरी चिंचवड महापालिकेची सदस्य संख्या १२८ कायम राहणार ?

0
227

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेची वॉर्ड संख्या 227 वरुन 236 करण्यात आली होती. मात्र, राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा ही संख्या २२७ केली होती. या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

मुंबई महापालिकेतील प्रभागरचना २२७ वर कायम राहणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे मोठे राजकीय पडसाद उमटणार आहेत. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मुंबई प्रमाणे आता राज्यातील ज्या महापालिकांची सदस्य संख्या वाढविण्यात आली आहे तिथेसुध्दा पूर्वी जी सदस्य संख्या होती तीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १२८ ची सदस्य संख्या ११ ने वाढवून १३९ पर्यंत करण्यात आली होती. आता पूर्वी प्रमाणेच ती १२८ सदस्य असेल, असे सांगण्यात आला. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना या दोन मुद्यांवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी प्रलंबित आहे.