पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ४ ते ८ जानेवारीदरम्यान सांगवीत पवनाथडी जत्रेचे आयोजन

0
865

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ४ ते ८ जानेवारी या कालावधीत सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते होणारआहे.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित असतील.

पवनाथडी जत्रेअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता म्युझिक मेलेडी हिंदी-मराठी नृत्यगीतांचा कार्यक्रम, रात्री सात वाजता गर्जा हामहाराष्ट्र कार्यक्रम, शनिवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम, रात्री सात वाजता लावण्य दरबार हा लावण्यांचा कार्यक्रम, रविवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकारांचा आणि रात्री सात वाजता बॉलीवूड स्टार्स हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजलांचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम, रात्री सात वाजता गायन,वादन व नृत्याचा कार्यक्रम, मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीतांचा कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे.