पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्षांची गोची; मुस्लिम मतांचा मोठा आधार गमावण्याची भिती असल्याने भुमिका गुलदस्त्यात

0
712

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : मशिदीतील भोंग्यासमोर भोंगा लावून त्यावर हनुमानचालिसा लावण्याचा आदेश `मनसे` अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावर अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटली. तसेच त्यावर पक्षातही एकजूट दिसली नाही. यावरून पुण्यात मतभेद समोर आले. परिणामी पुण्याच्या शेजारी पिंपरी-चिंचवड `मनसे`ने पक्षप्रमुखांच्या भुमिकेवर आस्ते कदम जायचे ठरवले आहे. परवाच्या (ता.९ एप्रिल) ठाण्याच्या सभेत पक्षप्रमुख काय भुमिका घेतात, त्यावर आमची पुढील व्यूहरचना असेल, असे पिंपरी-चिंचवड मनसेतून सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड मनसेचे अध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांचे मुस्लिम बांधवांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असून नवीन वार्डरचनेत मुस्लिम मतांचा मोठा आधार असल्याने त्यांची गोची झाली आहे.

दरम्यान, रमजानचा महिना सुरु झाल्याने मशिदीसमोर भोंगे लावून त्यावर हनुमानचालिसा वाजविण्याची मोहीम `मनसे`कडून तूर्त स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला विशिष्ट कालावधी मनसेकडून दिला जाईल, असे समजते. त्याची घोषणा स्वत राज हे ठाण्याच्या सभेत करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत, तरी पिंपरी-चिंचवडमधील `मनसे`ने गप्प राहण्याचे ठरवले आहे. तोच कित्ता इतरत्रही गिरवला जाण्याची शक्यता आहे. मात्र,`मनसे`चे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांच्या भुमिकेसारखी `मनसे`ची भूमिका पिंपरी-चिंचवडमध्ये नसेल, असे शहरप्रमुख तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी आज (ता.7एप्रिल) ‘सरकारनामा’ला सांगितले. राज ठाकरे जो आदेश देतील तो मान्य असेल, त्यांच्याबरोबरच कायम राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाध्यक्षांच्या पाडवा सभेतील आदेशानंतरही उद्योगनगरीत `मनसे` शांत राहिली आहे, हे विशेष. त्यामुळे त्याची शहरात चर्चा आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर हा `इश्य़ू` आयता हातात येऊनही तो त्यांनी `कॅश` केलेला नाही. त्याचे कारण म्हणजे शहरात पक्षाचे काही मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे लगेच भोंगे तथा हनुमाचालिसेच्या घोषणेची शहरात अंमलबजावणी मनसेकडून करण्यात आलेली नाही. त्यात रमझानचा महिना व त्यानिमित्तच मुस्लिम बांधवाचे उपवास सुरु आहेत. त्यात, जर हे भोंगे लावले, तर चुकीचा संदेश जाईल. पक्षातील मुस्लिम कार्यकर्तेही दुखावले जातील, म्हणून पिंपरी-चिंचवड `मनसे`ने आस्ते कदम जायचे ठरवले आहे. त्यात पाडव्यानंतर लगेच आठवडाभरातच राज ठाकरे लगेच ठाण्यात सभा घेण्याचे त्यांनी जाहीर केल्याने त्यात ते काय आदेश देतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये भोंगे वाजविण्याचा बेत तूर्तास रहित केल्याचे शहर `मनसे`तून सांगण्यात आले.