पिंपरी चिंचवड मध्ये चोरटयांचा सुळसुळाट; ७० हजारांचा ऐवज लंपास

0
216

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी आणि भोसरी परिसरातील दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण ७० हजारांचे तीन लॅपटॉप चोरून नेले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात श्रीचीता दशरथ खर्डे (वय २३, रा. अजमेरा हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. खर्डे यांचे घर बुधवारी (दि. १६) सकाळी सहा ते दहा वाजताच्या कालावधीत उघडे होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात निलेश पोपट चांदगुडे (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. चांदगुडे हे ५ ऑक्टोबर रोजी रात्री बारा ते साडेबारा या कालावधीत त्यांच्या चक्रपाणी वसाहत येथील घराच्या बाहेर चालत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून १० हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप चोरून नेला. याबाबत दोन महिन्यानंतर फिर्याद देण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.