पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; चिंचवड, प्रेमलोक पार्क येथे आयुक्तालय कार्यान्वित

0
1315

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. ९) उद्घाटन करण्यात आले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमध्ये असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा इमारतीत पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तालयाची आतून पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य मंत्री दिलीप कांबळे, पुणे ग्रामीणचे एसपी संदिप पाटील, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाला १५ ऑगस्ट २०१८ पासून सुरूवात झाली. परंतु, आयुक्तालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधून कामकाज सुरू होते. दरम्यानच्या काळात चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महापालिका शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी सज्ज करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता याच इमारतीतून पिंपरी-चिंचवड शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.

चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील पोलिस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. याठिकाणी बसवण्यात आलेल्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांनी अनावरण केले. तसेच त्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचीही पाहणी केली. पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.