पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

0
495

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी, चिंचवड, भोसरी  विधानसभा मतदारसंघातील  निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१ ) मतदान होणार  आहे. त्यासाठी  प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.  प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यासाठी आज (रविवार) सकाळपासून लगबग होती. मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, पोलिस यांची नियुक्ती करण्यात आली. पावसामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.  

सकाळपासून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन सीलबंद करून संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सर्व साहित्य पोहचविण्याची अधिकारी, कर्मचाऱ्यांची लगबग सुरु होती.  तसेच मतदान केंद्र निहाय कर्मचा-यांना पोहचविण्यासाठी बसेस आणि छोट्या गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.

चिंचवड मतदारसंघात २ लाख ७६ हजार ९२७ पुरूष आणि २ लाख ४१ हजार ९८० महिला आणि इतर ३२ असे एकूण ५ लाख१८ हजार ३०९ मतदार आहेत. तर ४९५ दिव्यांग मतदार तर १७१ सैनिक मतदार आहेत. ४९१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ३३ मतदान केंद्राचे स्थलांतर केले आहे. ४९१ कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तयार ठेवण्यात आली आहेत. ९८ कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि ५० व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात १ लाख ६७ हजार ६०० महिला, तर १ लाख ८५ हजार ९३९ हजार पुरूष असे ३ लाख ५३ हजार ५४५ हजार  मतदार आहेत. ३९९ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ५३ मतदान केंद्राचे स्थलांतर केले आहे. १९ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहे.

भोसरी मतदारसंघात १ लाख ९९ हजार ४९३ महिला आणि २ लाख ४१ हजार ६०१ पुरूष आणि इतर ५३ असे ४ लाख ४१ हजार १२५ मतदार आहेत. ४११ मतदार केंद्रावर  मतदान होणार आहे. ४९४ कंट्रोल युनिट, ४९४ बॅलेट युनिट आणि ५३५ व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आली आहेत.

मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, मतदान  शांततेत पार पडावे,  यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तात्काळ कारवाईसाठी गुन्हे शाखेची सात विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी त्या अनुषंगाने आयुक्तालय हद्दीतील क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रशीटर, तडीपार गुन्हेगार यांचे विरोधात विशेष मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.