पिंपरी चिंचवड शहरात ३७ मतदान केंद्र संवेदनशील

0
580

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील ३७ मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून निवडणूक आयोगाने जाहीर केली आहेत. पिंपरी राखीव मतदारसंघात ती सर्वाधिक म्हणजे १९ आहेत. चिंचवडमध्ये १२, तर भोसरी मतदारसंघात सहा मतदान केंद्र संवेदनशील आहेत. 

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न तेथे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग व पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेण्यात आला आहे. पिंपरी हा राखील मतदारसंघ शहरातील सर्वात लहान मतदार संघ असून सुमारे ५५ झोपडपट्ट्या या मतदार संघात येतात.

पिंपरी या एकमेव मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी अशी लढत आहे. शहरातील सर्वाधिक झोपड्या व निरक्षरतेचे प्रमाण पिंपरीत आहे. या कारणामुळे तेथे संवेदनशील मतदानकेंद्र अधिक असल्याचे पिंपरी विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पिंपरी, कासारवाडी, दापोडी या भागात ती आहेत.

राज्यातील दोन नंबरचा मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या भोसरीमध्ये भाजप विरुद्ध आघाडी पुरस्कृत अपक्ष अशी लढत आहे. ५,१८,३०९ मतदार असलेल्या चिंचवडमध्ये ती महायुती विरुद्ध आघाडी पुरस्कृत अशी आहे.

दरम्यान, मोठ्या संख्येने मतदारांना स्लीपा (मतदानचिठ्ठी) वाटल्याचा आयोगाचा दावा फोल ठरल्याचे समोर आले आहे. या कारणामुळेही मतदान कमी होत आहे. एकीकडे आयोगाची स्लीप मिळाली नसताना काही उमेदवारांनी, मात्र, आपले फोटो, नाव, निवडणूक चिन्ह, निवडणूक केंद्राचा पत्ता असलेल्या स्लिपा घरपोच केल्याचे दिसून आले आहे.