पिंपरी-चिंचवडमधील ५७ धोकादायक बांधकामांना महापालिकेकडून नोटीसा

0
524

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात ५७ धोकादायक बांधकामे असून त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३ अतिधोकादायक बांधकामे महापालिकेने पाडली आहेत. तर ३१ बांधकामांची डागडुजी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता राजन पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.  

पाटील म्हणाले की, पुण्यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी –चिंचवडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. शहरात महापालिकेने परवानगी दिलेल्या व सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या बांधकामांची संबंधित बीट निरीक्षकांना  पाहणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  प्रभाग क्रमांक ‘अ’ मधील २२, ‘ब’ मधील १०, ‘क’ मधील ३, ‘ड’ मधील ४, ‘इ’ मधील ३, ‘फ’ मधील ३ तर ‘ग’ मधील १२ अशी ५७ बांधकामे धोकादायक आहेत.

शहरातील विविध विकासकामामधील बांधकामामुळे किंवा बेसमेंटमधील पाण्यामुळे तसेच मुसळधार   पावसामुळे जीवितहानी व वित्तहानी टाळण्याबाबत  खबरदारी घेण्यात येत आहे. सीमाभिंतलगतच्या व नाल्याच्या बाजूस किंवा झाडाखाली कामगारांच्या वसाहती असल्यास त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

सीमाभिंत, रिटेनिंग वॉल, इमारत बांधकाम धोकादायक आहेत की नाही ? याची तपासणी करून ९ जुलैपर्यंत अहवाल देण्यास बीट निरीक्षकांना सांगितले आहे. धोकादायक बांधकामांबाबत  योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना बिल्डरांना आणि सोसायटीधारकांना देण्यात आल्या आहेत.

सीमाभिंत, रिटेनिंग वॉल, वॉचमन केबीन, पाण्याची टाकी आदी बांधकामांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी दाखल घेण्यात येत नाही. मात्र, अशी बांधकामे पडून जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी दाखल घेणे बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर बांधकामाचे सर्व प्रकारचे स्ट्रक्चर व डिझाईन केल्याचे हमीपत्र बिल्डरांकडून  घेतल्यानंतरच त्यांना पुर्णत्वाचा दाखला देण्यात येणार आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.