पुरंदरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0
539

पुरंदर, दि. ३ (पीसीबी) – कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) सकाळच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील पोल्ट्री शेडमधून उघडकीस आली.

दत्तात्रय माणिकराव काकडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.  याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथे  दत्तात्रय काकडे यांचे पाच हजार पक्षांचे पोल्ट्रीचे शेड आहे. त्यासाठी त्यांनी काही स्थानिक सावकारांकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. संबंधित सावकाराने या पैशांसाठी काकडे यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत काकडे यांनी एका खासगी पतपेढीत कजार्साठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सावकाराला देण्यासाठी पैशांची जमवाजमव होत नसल्याने काकडे यांनी अखेर मंगळवारी रात्री पोल्ट्री शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय यांच्यावर सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. सासवड पोलीस तपास करत आहेत.