पिंपरी चिंचवडच्या शाळासुध्दा या तारखेपर्यंत बंद – आयुक्त श्रावण हर्डीकर

0
343

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेने २३ नोव्हेंबर (सोमवार) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आज मागे घेतला आहे. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असे आज सायंकाळी सांगण्यात आले. रात्री पर्यंत त्याबाबतचे लेखी स्पष्टीकरण जारी करत असल्याचे सांगितले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी `पीसीबी टुडे` शी बोलताना सांगितले की, महापालिकेच्या शाळा ३० नोव्हेंबर पर्यंत बंदच राहतील. मात्र, या दरम्यान शाळा सुरू करण्यासाठी जी काही तयारी करायची आहे ते काम सुरू राहिल. त्यामध्ये अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोविड चाचणी, पालकांची संमती घेणे आणि सामाजिक अंतर, हात स्वच्छता, शाळा वाहतूक अंमलबजावणी आणि निर्जंतुकीकरण यासाठी शालेय पायाभूत सुविधा तयार करणे या गोष्टींचा समावेश असेल. कोरोना साथीची काय परिस्थिती आहे ते पाहून ३० नोव्हेंबरला शाळा बंद ठेवायच्या की सुरू ठेवायच्या याचा पुन्हा विचार केला जाईल.

दरम्यान, पुणे आणि मुंबई शहरातील शाळा २३ पासून सुरू करायच्या नाहीत असा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला. पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. असंख्य पालक, शिक्षक आणि काही राजकीय नेत्यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली होती. जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी एक व्हिडीओ तयार करून या विषयावर गंभीर मुद्दे समोर आणले आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या अशी विनंती थेट राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना केली. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन अखेर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सायंकाळी त्याबाबतचा निर्णय जाहीर केला आणि शाळा ३० नोव्हेंबर पर्यंत बंद राहतील असे सांगितले.