पिंपरीत मयत व्यक्तीचे बनावट कागदपत्रे सादर करुन खरेदी केले घर

0
1098

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – मयत व्यक्तीची बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर करुन त्याच्या नावावरील घर स्वत: खरेदी करुन दुसऱ्याला विकल्याने तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ५ जुलै २०१३ ते ११ एप्रिल २०१४ दरम्यान पिंपरीतील दस्त नोंदणी कार्यालयात घडली.

याप्रकरणी हरिराम माधवराव जसोतानी (वय ७७, रा. पिंपरी कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष हिरालाल यादव (वय ३५, रा. वाघेरे कॉसनी, पिंपरीगाव), अनिल रंगनाथ आढाव (वय ४०, रा. पुणे) यांच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिराम यांचे चुलते कालाचंद उर्फ सेवाराम जसोतानी यांचे २००९ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या घरात हरिराम यांचे कुटूंब राहत आहे. आरोपी संतोष याने ५ जुलै २०१३ मध्ये हरिराम यांच्या मयत चुलत्याच्या जागी अज्ञात इसम उभा करुन त्याचे बनावट आधारकार्ड बनविले. त्याआधारे घराचे बनावट कागदपत्र तयार करुन दस्त तयार केली. या दस्तच्या आधारे हरिराम राहत असलेले घर खरेदी केले. त्यानंतर ते घर काही दिवसांनी अनिल याला विकले. याप्रकऱणी हरिराम यांनी संतोष, अनिल आणि एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिसांनी संतोष याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.