पिंपरीतील यशवंतनगर येथे हप्त्यासाठी टायर व्यावसायिकास रॉडने जबर मारहाण

0
561

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – हप्ता देत नसल्याच्या कारणावरुन तीन जणांच्या टोळक्यांनी एका टायर व्यावसायिकास लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच ही भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या एकास कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि.३१) रात्री साडेनऊच्या सुमारास यशवंतनगर येथील के.जी.एन.टायर्स सेंटर येथे घडली.  

छोटु कुमार श्रीबनवारी राम (वय १९, रा. यशवंतनगर चौक, टेल्को रोड, पिंपरी) आणि रामशंकर गुप्ता असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नवनाथ डेंगळे (वय ४०, रा. यशवंतनगर, पिंपरी) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी छोटु यांचे यशवंतनगर येथे के.जी.एन.टायर्स सेंटर नावाचे दुकान आहे. महिन्याभरापूर्वी आरोपी नवनाथ आणि त्याच्या काही साथीदारांनी छोटु यांना, “इथे धंदा करायचा असेल तर दरमहिन्याला आम्हाला हफ्ता दे”. महिना उलटून गेला तरी सुध्दा छोटुने आरोपींना हप्ता दिला नाही. त्यानंतर रविवारी (दि.३१ मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी  नवनाथ आणि त्यांचे दोन साथीदार छोटुच्या दुकानावर गेले आणि “तु आम्हला हप्ता का देत नाहीस” असे विचारले. छोटुने त्यांना मालकाकडून पैसे घ्या असे सांगितले. यावर रागावलेल्या आरोपींनी छोटूला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहुण छोटुचे ओळखीचे रामशंकर गुप्ता हे भांडण सोडवण्यासाठी मधी गेले. आरोपींनी त्यांनाही कमरेच्या पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी छोटू आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.