पिंपरीतील महात्मा फुलेगनरमध्ये तडे गेलेल्या घरातून गरोदर महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

0
485

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरीत तडे गेलेल्या घरातून गरोदर महिलेची सुखरूप सुटका करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. ही महिला पाच महिन्यांची गरोदर होती. या महिलेच्या घराशेजारी नाल्याचे काम सुरू होते. त्यामुळे महिलेच्य घराला तडे गेले.

संगीता केशवराम निशाद असे या महिलेचे नाव आहे. अग्निशमन दलाने या महिलेची सुखरूप सुटका केल्याने या महिलेने आणि इतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचे आभार मानले. एका नागरिकाने संगीता निशाद या तडे गेलेल्या घरात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. या महिलेच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले. कैलास वाघरे, चंद्रशेखर घुले, महेंद्र पाठक, विवेक खांदेवाड, प्रतीक कांबळे आणि विशाल लाडके या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सहा मिनिटात संगीता निशाद या गरोदर महिलेची सुटका केली.

संगीता निशाद यांचे पती मजुरीचे काम करतात. ते कामावर गेले होते. निशाद यांच्या घराजवळ नाल्याचे काम सुरू होते. संगीता निशाद यांचे घर मातीचे असल्याने त्याला तडे गेले. संगीता निशाद यांनी घराच्या आतून कडी लावली होती. त्या घाबरल्या होत्या. दरवाजा उघडला असता तर भिंत कोसळून अनर्थ घडला असता. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला सुखरूप सोडवले.