पालखी सोहळा रद्द, परंपरा कायम ? कोरोना प्रसार होऊ नये म्हणून सोहळा प्रमुख तयार, शासकीय बैठकिनंतर निर्णय होणार जाहीर

0
2128

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोना रुग्णांची वाढता संख्या पाहता आणखी किमान दोन-चार महिने परिस्थितीत सुधारणा होण्याची लक्षणे दिसत नसल्याने, सुमारे ३३५ वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा यंदा खंडीत होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, लाखो वारकऱ्यांसह पायी वारी रद्द झाली तरी देहूतून जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदितून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन पंढरपूरात विठ्ठल दर्शनाची परंपरा कायम असेल, असेही सांगण्यात येते. शासकीय बैठकिनंतर या संदर्भातील अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, असे समजते.

संत तुकाराम महाराज यांचे सुपूत्र नारायण महाराज हे पालखी सोहळ्याचे जनक आहेत. देहू ते पंढरपूर पायी वारीची परंपरा त्यांनी सन १६८५ मध्ये सुरू केली. या सोहळ्याचे यंदा ३३५ वे वर्षे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी ते पंढरपूर जाते. त्रंबकेश्वर (नाशिक) मधून संत निर्वृतीत नाथ, जळगावातून संत मुक्ताई, सासवड मधून सोपानकाका, शेगाव (विदर्भ) मधून संत गजाजनन महाराज अशा संतांच्या पालख्या आषाढी वारी साठी पंढरपुरात येत असतात. खानदेश, मराठवाडा, कोकण, विदर्भातून सुमारे पाच ते सहा लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. सुमारे महिना-दीड महिना त्यासाठीची तयारी सुरू असते. आता कोरोनामुळे देशभर टाळेबंदी आहे. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबई-पुणे शहरात ती आणखी एक महिना वाढविली जाण्याची शक्यता आहे. त्यातच सोशल डिस्टंन्सिंगचे बंधन कायम असल्याने पालखी सोहळा होणार की नाही याबाबत भागवत धर्मातील वारकऱ्यांना उत्कंठा लागून राहिलेली आहे.

देहू संस्थानचे विश्वस्थ संजय महाराज मोरे म्हणाले, पालखी प्रस्थान १२ जूनला आहे. १ जुलैला पंढरपूर आणि नंतर परत, असा देहू ते पंढरपूर हा सोहळा आहे. वेळापत्रक तयार आहे, पण काय करायचे त्याबाबत अद्याप ठरलेले नाही. कोरोनाच टाळेबंदी ३ मे पर्यंत टाळेबंदी आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोहळाप्रमुखांची एक बैठक होईल. शासन काय म्हणते, सरकारची भूमिका काय आहे त्यानुसार निर्णय होईल. सद्याची परिस्थिती पाहता आम्हालाही सोहळ्याचा आग्रह धरता येणार नाही. कोरोनाचा प्रसार पाहता आततायीपणा करूनही चालणार नाही, ते घातक ठरू शकते. देहू संस्थानच्या विश्वस्थांची बैठक, शासनाशी चर्चा करून ठरवू. सोहळा रद्द झाला तरी मोजक्या लोकांना घेऊन पंढरपूर वारीची परंपरा अखंड ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे म्हणाले, या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सर्व सोहळा प्रमुखांची एक व्हिडीओ कान्फरन्स बैठक घेण्याचा प्रयत्न आहे. कोरोना बद्दल मत जाणून त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न आहे. सोहळा रद्द केला तरी परंपरा कायम ठेवू. यापूर्वी १८९७ मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही ब्रिटीश सरकारने सोहळ्यावर बंदी घातली होती, पण आडवाटने सायकलवरून पादुका पंढरपुरात नेल्या आणि परंपरा कायम राखली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडी क्रमांक १५७ चे चालक उत्तम महाराज शेलार यांनी एक पर्याय सुचविला आहे. रथा न काढता पालखी ट्रकमध्ये ठेवून न्यायची आणि परंपरा कायम ठेवायची. कुठेही थांबायचे नाही, मुक्काम नाही. सोहळा हा वारकऱ्यांच्या संख्येवर आधारीत नसून परंपरेप्रमाणे होणे महत्वाचे आहे. कारण हैबतीबाबांनी पादुका गळ्यात बांधून मोजक्या वारकऱ्यांसोबत वारी केल्याचा इतिहास ज्ञात आहे. या सोहळ्यात विणेकरी, चोपदार, माऊलींचे दोन पुजारी, संस्थानचे दोन विश्वस्थ, एक मानकरी आणि एक सेवक असे सहभागी होतील. त्यातून नियमांचे पालन होईल आणि परंपरा राखली जाईल.

दरम्यान, आळंदी संस्थानचे विश्वस्थ आणि सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध झाले नाही.

यंदा होणार की नाही याबाबत तमाम वारकरी वर्गाला साशंकता आहे.
प्रसार लक्षात घेऊन