पाच सराईत मोबाईल चोरट्यांना सव्वा लाखांच्या मोबाईलसह अटक; गुन्हे शाखेची कारवाई

0
792

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – जबरदस्ती मोबाईल चोरुन ते विकणाऱ्या पाच जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक करुन त्यांच्याकडून तब्बल १ लाख ३२ हजारांचे एकूण २९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली.

पहिल्या कारवाईत पोलिसांनी देहुरोड येथील शितळादेवी मंदिराजवळून मयुर सुनिल महाजन (वय १९) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली.  त्यानंतर देहुगाव येथील पेट्रोलपंपाजवळून अविनाश प्रकाश लोखंडे (वय २०, रा. विष्णु समुद्रे चाळ, खोली कॅ.१ विठ्ठलवाडी, देहुगाव) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराल अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईमधून आरोपींकडून पलिसांनी एकूण २८ विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले. तसेच तिसऱ्या कारवाईत बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय ३१, रा. शेंडगे यांची रुम, साई मंदीरामागे,वेणुनगर, वाकड) या सराईत मोबाईल चोरट्याला त्याचे मुळ गाव समतानगर परळीवेस, आंबाजोगाई, जि. बीड येथून चोरीच्या एका मोबाईलसह अटक करण्यात आली आहे. या कारवायांमुळे देहुरोड पोलीस ठाण्यातील एकूण चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर गुन्ह्यातील पाच ही आरोपींना देहुरोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रविण दळे, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदिप ठाकरे, राहुल खारगे यांच्या पथकाने केली.