पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर हल्ला

0
155

कराची, दि. ६ (पीसीबी) – गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, उधमपूरमधील हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (४ डिसेंबर) एका दहशतवाद्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. परंतु, यातून तो दहशतवादी थोडक्यात बचावला. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याला जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यापाठोपाठ बुधवारी (६ डिसेंबर) पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर हल्ला झाला. भारतीय संरक्षण यंत्रणांच्या रडारवर असलेल्या एक दहशतवाद्याची पाकिस्तानच्या कराची शहरात हत्या करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तैय्यबा या संघटनेतील प्रमुख दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अदनान याची कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. हंजला हा २०१६ मध्ये जम्मू काश्मीरच्या पंपोर येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यामागचा सूत्रधार होता. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे आठ जवान शहीद झाले होते. तसेच २२ जवान जखमी झाले होते. हंजला हा लष्कर-ए-तैय्यबाचा प्रमुख हाफिज सईदचा निकटवर्तीय होता.

हंजला अदनानने २०१५ मध्ये उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तर १३ जवान जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी एनआयएने तपास केला आणि ६ ऑगस्ट २०१५ रोजी एक चार्जशीट दाखल केली. या तपासांदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हंजला अदनान हाच या दोन्ही हल्ल्यांमागचा मास्टरमाईंड होता हे उघडकीस आलं. तसेच तो पाकिस्तानमध्ये बसून हल्लेखोरांना हल्ल्यांबंधीच्या सूचना देत होता.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा भागात अनेक आत्मघातकी हल्ल्यांमागे हंजलाचा हात होता. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याचं, आत्मघातकी हल्ल्यांसाठी प्रशिक्षित करण्याचं काम हजंला करत होता. हंजला अदनान याला लष्कर कम्युनिकेशन एक्स्पर्ट म्हणूनही ओळखलं जात होतं.