पवना जलवाहिनीच्या पाईप्स एकत्रित करण्याच्या कामासाठी ८० लाखाच्या खर्चास मंजुरी

0
904

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची बंदिस्त पवना जलवाहिनी योजना आठ वर्षानंतर  रद्द करण्यात आली आहे. या जलवाहिनीसाठी २६ किलोमीटर अंतरावर टाकलेल्या सर्व पाईप्स एकत्रित करण्याच्या कामासाठी  ८० लाखाच्या  खर्चास स्थायी समितीच्या आज (बुधवार) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी होते.

जलवाहिनीच्या एकत्रित केलेल्या पाईप चिखली येथील नियोजित जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात स्थलांतरित करण्यात येणार होत्या. मात्र, या ठिकाणी सामाजिक वनीकरण झाल्याने तेथे पाईप ठेवता येणार नाहीत.

दरम्यान, रावेत येथील गायरानात या पाईप ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाईप ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान, शासनाची स्थगिती आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे आठ वर्षानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने महापालिकेला नोटीस देऊन काम बंद करण्याची परवानगी मागितली होती. यावर महापालिकेने ही योजना रद्द केली. आता या प्रकल्पातील पाईप एकत्रित करून दुसऱ्या प्रकल्पासाठी हे पाईप वापरण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर  ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.