परिचारिकांचा संप मागे : आमदार महेश लांडगेंचा ‘फैसला ऑन दी स्पॉट’

0
429

– महापालिकेच्या भोसरी रुग्णालयांतील परिचारिकांना दिलासा

– पगाराला टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदली होणार

पिंपरी, दि.5 (पीसीबी) : कोरोना संकटकाळात ‘कोरोना योद्धा’ म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या परिचारिकांनी भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारला. त्यामुळे ९० कोविड बाधित रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. प्रसंगावधान राखत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. संबंधित परिचारिका यांच्याशी चर्चा करुन ‘ऑन दी स्पॉट’ फैसला करीत प्रश्न निकालात काढला.

कमी पगार आणि तो देखील वेळेवर मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील परिचारिका मंगळवारी (दि. 4) सकाळी संपावर गेल्या. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती.
दरम्यान, आमदार लांडगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. संबंधित परिचारिकांना एकत्र बोलावून चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.
महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले की, या रुग्णालयातील परिचारिकांना तीन महिन्यांसाठी घेतले असून, त्यांना पगारही व्यवस्थित आहे. या महिन्याच्या पगाराचा धनादेश काढला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी आल्यामुळे तो बॅंकेतून त्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता. आज मंगळवारी सकाळी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

परिचारिकांचे म्हणणे काय आहे?
करोना बाधितांवर उपचार करण्याचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिचारिकांप्रमाणे आपल्याला पगार द्यावा. तसेच पगार वेळेवर मिळावा. वेतनवाढ केली पाहिजे. शिष्टमध्ये महापालिका परिचारिकांप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजे, आदी मागण्या भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी केल्या आहेत.

परिचारिकांनी व्यक्त केले समाधान…
शासनाकडून किंवा संबंधित कंत्राटदाराकडून परिचारिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी आमदार लांडगे यांनी स्वत: घेतली. तसेच, पगारासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करावी. संबंधित परिचारिकांना वेतनवाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि सहायक आरोग्य वैद्यकीय लक्ष्मण गोफने यांना केल्या आहेत. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी हस्तक्षेप करीत परिचारिकांचे वेतन तात्काळ काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिचारिकांनीही समाधान व्यक्त केले.