“पंतप्रधान कार्यालय निरोपयोगी, नितीन गडकरी यांच्याकडे कोरोना परिस्थितीची सर्व सूत्र सोपवा”

0
440

– खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्वीटमुळे भाजपा गोटात खळबळ

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्यावर सोपविली पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मोदी यांना भाजपा मधून पर्याय म्हणून आता नितीन गडकरी यांचे नाव पुढे करण्याच्या पडद्यामागिल हालचाली एक भाग म्हणून स्वामी यांच्या मागणीकडे राजकीय निरीक्षक पाहतात.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे त्यांना ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्ष वर्धन अधिक खुलून काम करतील, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरींच्या नावाला अनेकांचा पाठिंबा
पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्यावं. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये नितीन गडकरी यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे, असेही स्वामींनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या या प्रस्तावाचे ट्विटवरवर अनेकांनी स्वागत केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असणारे नितीन गडकरी हे झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला ते मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरींकडे सोपवणार का, हे पाहावे लागेल.

मोदी यांच्यानर चौफेर टीका, भाजपासाठी मारक – प. बंगाल सह पाच राज्यांच्या निवडणुका आणि कुंभमेळ्या मुळे देशात कोरोनाचे संकट गडद झाले आणि त्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याची टीका आता सुरू आहे. देश विदेशातील माध्यमांनी गेले दहा दिवस या विषयावर मोदी यांना अक्षरशः टार्गेट केले आहे. स्वतः मोदी यांनी त्याला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजराथ, कर्नाटक या भाजपा शासीत राज्यांमध्येही कोरोना हाताबाहेर गेला आहे. केवळ मोदी यांनी दुर्लक्ष केल्याने देशभर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक निकालातून त्याचे उत्तर मिळाले आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचा जबरदस्त फटका भाजपाला बसला आहे. आगामी काळात मोदी यांना पर्याय म्हणून शाह यांचे नाव घेतले जात होते, पण ते सर्वसमावेशक नाव नसल्याने आता नितीन गडकरी यांचे नाव पुढे आले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात यापूर्वीच मोदी यांना पर्याय म्हणून गडकरी यांच्या नावाची चर्चा होती. त्याशिवाय बहुसंख्य विरोधकांचीही गडकरी यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळेच खासदार स्वामी यांच्या ट्विटला विशेष महत्व असल्याचे जाणकार सांगतात.