परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
496

मुंबई,दि.२३(पीसीबी) – सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरले. विरोधकांकडून वाझे प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रं देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप सिंह यांनी याचिकेत केलेला आहे. सिंह यांनी याचिकेत तीन मागण्या केलेल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत केलेल्या आहेत. त्यामुळे याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.