परदेशातून किती काळा पैसा देशात आला? १५ दिवसांत माहिती देण्याचे पीएमओला आदेश

0
652

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परदेशातील काळा पैसा आणणार, अशा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, सत्तेवर येऊन मोदी सरकारला साडेचार वर्ष होत आली आहेत. अद्यापही परदेशातून एक दमडीही मोदींना भारतात आणता आलेली नाही. दरम्यान, परदेशातून किती काळा पैसा देशात आला? त्यातील किती पैसे लोकांच्या खात्यात टाकले, याबाबतची माहिती १५ दिवसांत देण्याचे आदेश माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) दिले आहेत.

त्याचबरोबर मे २०१४ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत किती केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या व त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली, याची माहितीही १५ दिवसांत देण्याचे आदेश माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयास दिले आहेत. आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांच्या अपिलावर मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथूर यांनी पंतप्रधान कार्यालयाला १५ दिवसांच्या आत ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

चतुर्वेदी यांनी एका माहिती अधिकार अर्जात सरकारला १६ मुद्द्यांवर माहिती मागितली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने याचे उत्तर देण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, काळ्या पैशाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला होता. पीएमओने म्हटले होते की, हे कलम २( फ) अंतर्गत येत नाही. दस्तऐवज वा इलेक्ट्रॉनिक रूपात अस्तित्वात असलेली माहिती दिली जाऊ शकते, असे या कलमात स्पष्ट केले आहे. दरम्यान, मोदी सरकारने केंद्रीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी विविध माध्यमांतून किती खर्च करण्यात आला आहे, याचाही हिशेब पंतप्रधान कार्यालयाने अद्यापही दिलेला नाही.