पत्रकारांनाही कोरोना योद्ध्याचा दर्जा आणि ५० लाखांचे विमा संरक्षण द्या; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

0
1255

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा हा दर्जा देऊन त्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा. तसेच सरकारने पत्रकारांना कोरोना प्रोटोक्शन कीट द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणीचे निवेदन मेल केले आहे.

त्यात म्हटले आहे, “संपूर्ण देश गेल्या महिनाभरापासून कोरोना या महाभयंकर विषाणूविरोधात लढा देत आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. विषाणूच्या संसर्गाचा विळखा वाढू लागला असून, मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांची काळजी घेणारे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी चोवीस तास रस्त्यांवर दिसणारे पोलिस योद्ध्यासारखे काम करत आहेत. या सर्वांना कोरोना योद्धा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. तसेच त्यांना ५० लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. ओडिशा राज्याच्या सरकारने कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाल्यास शहीदाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाविरोधात डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणेच पत्रकारही प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करत आहेत. कोरोना युद्धाची प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बांधवांकडून होत आहे. सरकार आणि जनतेमधला महत्त्वाचा दुवा म्हणूनही ते काम करत आहेत. हे काम करताना अनेक पत्रकार बांधवांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनाही सरकारकडून संरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरातील पत्रकार बांधवांनाही कोरोना योद्ध्याचा दर्जा देण्यात यावा. त्यांना ५० लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे. तसेच सरकारकडून प्रोटेक्शन कीट देण्यात यावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”