रेशन धान्य वितरणाबाबत दुकानदारामध्येही संभ्रम

0
613
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – रेशन धान्य वितरणाबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम असल्याचे माजी खासगार गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रधान सचिवांनी 15 एप्रिल 2020 रोजी परिपत्रक काढून वितरण कार्यपद्धती कशाप्रकारे केली जावी याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, परंतु धान्य घेण्याकरता येणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्यात यावी, अशा बातम्या काही वृत्तपत्रांतून आल्याने दुकानदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुकानदारांनी प्रधान सचिवांच्या परीपत्रकाचे पालन करायचे की वितरण विभागाने सांगितलेल्या सुचनांचे पालन करायचे  याबाबत स्पष्ट सांगावे असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण प्रधान सचिव श्री संजय कंधारे यांचे परिपत्रकात, नोंदवहीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धान्य घेण्याकरिता येणाऱ्या व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा किंवा स्वाक्षरी न घेता आपण  त्याचा आधार क्रमांक किंवा त्या घरातील सदस्याचा आधार क्रमांक द्यावा व शिधा पत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर मे/ जून महिन्याचे धान्य मिळाले, असा शिक्का मारावा असे स्पष्टपणे सूचित केले आहे. त्यानंतरही विविध बातम्या आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. जर वितरण विभाग सूचना माध्यमांद्वारे देत असेल तर दुकानदारांनी कोणाच्या सूचनांचे पालन करावे हे आपण स्पष्ट करावे,नाहीतर रेशनिंग दुकानदार आपली दुकाने बंद ठेवतील याची आपण नोंद घ्यावी, असा इशारा बाबर यांनी
निवेदनातून दिला आहे.